आपलं पुस्तक फाडून टाकणं खूपच वेदनादायी असतं…
कवी अनिल साबळे यांचा चटका लावणारा लेख
काल माझ्या एका मित्राला पुण्यामध्ये जुनी पुस्तके चाळताना माझा “टाहोरा” हा कवितासंग्रह सापडला. आपण जिथं नाव टाकून पुस्तक भेट देतो तेवढी जागा फाडून माझा कवितासंग्रह कुणीतरी रद्दीमध्ये विकून टाकला होता. मला माझा कवितासंग्रह रद्दीमध्ये कुणीतरी विकून टाकल्याचं दु:ख अजिबात नाही. मला दु:ख आहे कुणीतरी पुस्तक फाडून टाकल्याचं. पुस्तक विकायचंच होतं तर आहे तसंच विकून टाकायचं होतं. पुस्तक भेट दिलेल्या जागेचा कोपरा फाडून तरी कशाला टाकायचा. योगायोग असा की, नेमकं त्याच मित्राला पुस्तक भेट देणं राहून गेलं होतं. त्या मित्राला माझं पुस्तक अशा रितीने आणि निम्या किंमतीत मिळालं.
“अनिल साबळे यांचा कवितासंग्रह काही दिवस छापू नका. त्यामध्ये असलेल्या चुका मी सुधारुन तुम्हाला पुन्हा पुस्तक पाठवतो”. असा फोन एका कवीने परस्पर लोकवाड:मयगृह येथे केला होता. पण लोकवाड:मयगृह मधून मला लगेच फोन आला. फोन आल्यावर मी सावध झालो. त्या कवीचा आणि माझा काहीही संबंध नाही. असं मी सांगितलं तेव्हा माझं पुस्तक छापण्यासाठी पुढे गेलं. आणि पुस्तक छापून सुध्दा आलं.
आपण ज्यांना कवी म्हणतो, ती माणसं आपल्या आधी दुसऱ्या कुणाचं पुस्तक येऊ नये म्हणून कसा कट करु शकतात. हे पाहून मला हादराच बसला. ही गोष्ट मी आजवर कुणालाच सांगितली नव्हती. पण आज विषय निघाला आहे. तेव्हा ही गोष्ट जाहीरपणे सांगून टाकतो. यात काही खोटं असेल तर मी आयुष्यात एक ओळही लिहिणार नाही. आपण साधे, सामान्य असलो तरी एखादी हादरा देणारी गोष्ट आपल्या आत सलतच राहते.
मित्रांनो, चांगलं कलात्मक लिहिणं गरजेचं आहे. पण यांचा अर्थ असा नाही की, तुम्ही आपलंच पुस्तक पुढे जावं इतक्या खालच्या थराला जाऊ शकता. साहित्याचं कामच बुरखा फाडणं आहे. मग त्या बुरख्याआड कोणीही लपलेला असो. आज त्या ढोंगी कवीचा बुरखा मी या निमित्ताने फाडून टाकला आहे.
माझा कवितासंग्रह “टाहोरा” प्रकाशित झाला तेव्हा तुम्ही अमूकच प्रती विकत घ्या असा कुठलाही आग्रह लोकवाड:मयगृहकडून मला झाला नाही. उलट त्यांनीच मला वीस प्रती मोफत दिल्या. आणि शिवाय 2012 पासून मी नियमित लोकवाड:मयगृहकडून पुस्तके घेत आहे. अनेक वेळा पैसे नसले तरी मला घरपोच सवलतीमध्ये लोकवाड:मय गृह कडून पुस्तके मिळाली आहे. आणि मिळत आहे.
मीच आठ हजार रुपये खर्च करुन शंभर प्रती लेखकांना भेट देण्यासाठी विकत घेतल्या. पोस्टात जाऊन मी स्पीड पोस्टने लेखकांना पुस्तकं भेट पाठवली. प्रत्येक पुस्तक पाठवण्यासाठी मला पन्नास रुपये खर्च आला. तरी मी पुस्तक पाठवण्याचं काम आनंदाने केलं. खर्च आणि नफा पाहून कुणी लेखक होत नाही. आपलं पुस्तक मोठमोठया लेखकांनी वाचलं पाहिजे. असं प्रत्येक लेखकांला वाटतं. तसं मलाही वाटलं.
मी कुठल्याही पुरस्कारासाठी माझं पुस्तकं पाठवलं नाही. मला मिळालेले दोन-तीन पुरस्कार मी गरजू मुलीच्या शिक्षणासाठी देऊन टाकले. खेडमधील मला मिळालेला नामदेव ढसाळ पुरस्कार मी तिथेच मराठी शाळेत शिकणाऱ्या एका चौथीच्या मुलीला देऊन टाकणार होतो. कारण ती लहान मुलगी आपल्याला शिकता यावं म्हणून शाळेच्या पडवीत झोका बांधून आपल्या लहान भावाला सांभाळत होती. त्या मुलीला सोबत घेऊन मी पुरस्कार घेणार होतो. पुरस्काराची रक्कम सुध्दा त्या मुलीलाच देऊन टाकणार होतो. माझ्याबरोबर मित्रदेखील त्या मुलीला मदत देणार होते. पण त्या मुलीच्या शाळेचा पत्ताच मला लवकर दिला नाही. त्यामुळं ते राहून गेलं.
तुमचा कवितासंग्रह प्रकाशित होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही मदत पाठवू का? असं मला अनेक फेसबुकवरील मित्रांनी विचारलं होतं. पण मला कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी कुठलाही खर्च आला नाही. ही गोष्ट मी मित्रांना स्पष्टपणे सांगितली. तरीही एका मित्रांने पाठवलेली मदत मी एका आदिवासी मुलीला MS – CIT साठी देऊन टाकली.
आपण कितीही प्रामाणिक वागलो तरी खोटं बोलणारे, लुच्चेगिरी करणारे कवी पुढे जातात. ह्या गोष्टीचा खूपच संताप येतो. शिवाय मोठमोठे लेखक सुध्दा अशा कवींना आश्रय देतात. ही नेमकी भानगड तरी काय आहे हे कधी कधी कळत नाही.
माझ्यासारख्या सामान्य माणसाचं पुस्तक लोकवाड:मय गृहाकडून येणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपण भेट दिलेलं पुस्तक कुणी त्यावरची ओळख पुसून जाणूनबुजून रद्दीत विकतोय. ही गोष्ट नक्कीच वेदनादायी आहे. तेव्हा मित्रांनो, पुस्तक भेट देताना नक्कीच विचारपूर्वकच पुस्तक भेट द्या. आपलं पुस्तक मुद्दामहून कुणीतरी फाडून विकतोय. हे कृत्य फारच लाजिरवाणं आहे.
– कवी अनिल साबळे