आटपाडीच्या उत्तरेश्वर यात्रेत २७ लाखांचा “चौसा” बकरा
सांगोल्याचे उद्योगपती बाळासाहेब एरंडे करतात नेटके नियोजन
- दिल्ली झुकली, तुम्ही एवढे ताठर का?
- दुष्काळी भागाच्या पाण्याचा संघर्ष सुरूच ठेवू : डॉ. बाबासाहेब देशमुखांची घोषणा
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील श्री उत्तरेश्वर येथील यात्रा महोत्सव सुरू असून, आत्तापर्यंत ५ हजाराहून अधिक बकरे या यात्रेत दाखल झाले आहेत. यामध्ये एका चौसा जातीच्या बकऱ्याची किंमत २७ लाख रूपये इतकी असून, १५ लाख रूपयाची मागणी आलेली आहे. या सर्व यात्रेचे नेटके नियोजन सांगोला येथील उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी केले आहे.
आटपाडीतील कार्तिक महिन्यातील शेळ्या_ मेंढ्याचा बाजार संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्रप्रदेशात प्रसिद्ध आहे. जातीवंत मेंढ्यांच्या खरेदीसाठी शेतकरी, व्यापारी, हौशी पशुपालक येथे हजेरी लावतात. येथे होणाऱ्या उपस्थितीमुळे बकऱ्या, मेंढ्यांच्या किंमती गगनचुंबी ठरतात. वर्षभर तोच दर पशुपालकांना मिळतो. मागील दोन दिवसांपासून येथील बाजार समितीमध्ये शेळ्या-मेंढ्यांची मोठ्या प्रमाणात हजेरी पहावयास मिळत आहे.
दाखल झालेल्या जनावरांमध्ये सर्वाधिक संख्या म्हणजे ८० टक्के सहभाग मेंढ्यांच्या आहे. आटपाडी येथील मरगळेवस्ती येथील भारत सुखदेव मरगळे यांच्या माडग्याळी जातीच्या दोन वर्षाच्या चौसा बकऱ्याचा दर विक्रीसाठी तब्बल 27 लाख सांगण्यात आला. या बकऱ्याला 15 लाखापर्यंतची मागणी करण्यात आली.
भारत मरगळे यांनी हा बकरा अवघ्या तीन महिन्याचा असताना कर्नाटकातील इंडी येथून तब्बल दीड लाखाचा खरेदी केला होता. आत्ता हा बकरा वर्षाचा झाला असून, त्याच्या आकर्षक चेहऱ्यामुळे लाखोंच्या दराने मागणी होत असल्याचे मनोज मरगळे यांनी सांगितले.
याशिवाय गतवर्षी 16 लाखाची मागणी झालेल्या सोमनाथ जाधव यांचा बकरा व अन्य बकऱ्या, मेंढ्यांना लाखोंची मागणी नोंदविण्यात आली.
मेंढ्या-बकऱ्यासाठी स्टेज
बाजारात अनेक हौशी मेढपालांनी मेंढ्यांना सजवून वाजत गाजत मिरवणूक काढली. अनेक शेतकरी बेधुंद होवून नाचत होते. तर सांगोल्याचे उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांनी स्टेज उभारले होते. त्यावर ओव्यासह अनेक कार्यक्रम होत होते. त्यांच्या मेंढ्या, बकरा पाहण्यासाठी लोक गर्दी करीत होते.
माणदेशी मेंढी फॉर्म
सांगोल्याच्ये उदयोगपती, शेकापचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब एरंडे मागील १५ ते २० वर्षापासून आटपाडी येथील श्री उत्तरेश्वर यात्रेमध्ये माणदेशी मेंढी फॉर्म याची उभारणी करतात. त्यातून यात्रेमध्ये येणाऱ्या पशुपालकांना शेळ्या, मेंढ्यासाठी स्टेजची उभारणी करतात. त्यांच्या या नेटक्या नियोजनामुळे यांची घोड्यावरून मिरवणूकही काढण्यात आली.
अतुल पवारांचीही उपस्थिती
आटपाडी येथील उत्तरेश्र्वर येथील यात्रा महोत्सव सुरू आहे. मागील १० वर्षापासून अतुल पवारही या यात्रेला उपस्थित राहून मदत करीत आहेत. काल त्यांनी माणदेशी मेंढी फॉर्मला भेट देवून पशुपालकांना सत्कार केला.
माडग्याळ मेंढ्याची वैशिष्ट्ये
देशपातळीवर माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या मेढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तर, राज्यात प्रामुख्याने दख्खनी, माडग्याळसह काही गावठी मेंढ्यांच्या जाती आहेत. यापैकी माडग्याळ ही मेंढी जात मांसासाठी प्रसिद्ध असून, ही जात काटक आहे. इतर मेंढ्यांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक आहे. माडग्याळ नराचे वजन सर्वसाधारण ४० ते ५० किलो, तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. त्यामुळे देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी माडग्याळ ही जात प्रमुख मानली जाते.
मांसनिर्यातीतून शेतकऱ्यांना परकीय चलन
माडग्याळ मेंढी संगोपन व संवर्धनास प्रोत्साहन दिल्यास मेंढी मांसनिर्यातीतून शेतकऱ्यांना परकीय चलन मिळण्यास मदत होईल. उष्ण तापमान, अवर्षणप्रवण क्षेत्र, वारंवार उद्भवणाऱ्या चाराटंचाई परिस्थितीत गाई, म्हैस व शेळ्यांच्या तुलनेत प्रतिकूल वातावरणात तग धरणारा मेंढी हा एकमेव प्राणी आहे. मेंढीमध्ये गाय, म्हैस व शेळीच्या तुलनेत कमी प्रतीच्या चाऱ्याचे सेवन करून त्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते. तसेच मेंढ्यांच्या कातडी व लोकरीपासून तयार होणाऱ्या साहित्याच्या उद्योगाला चालना मिळेल आणि लेंडी खताचा उपयुक्त सेंद्रिय खत म्हणूनसुद्धा वापर करता येईल, त्यामुळे आर्थिक अडीअडचणीत तातडीने उत्पन्न देणारे मेंढीपालन इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायाच्या तुलनेत किफायतशीर विशेषतः दुष्काळी शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देऊ शकते.