आजच्या जीवनाशी ‘गाथा सप्तशती’तील गाथा सुसंगत : डॉ. महावीर शास्त्री
"मराठी भाषा संवर्धन पंधरवडा"निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन
सोलापूर : सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथाची निर्मिती सातवाहन कुळातील ‘हाल’ या राजाने केली. राजा हाल याने एक कोटी गाथांमधून सातशे गाथा संपादित करून हा ग्रंथ सिध्द केला आहे. प्रस्तुत ग्रंथातील गाथांमधून तत्कालीन समाजजीवन चित्रित होते. या गाथा आजच्या जीवनाशी सुसंगत आहेत. तसेच, या ग्रंथामध्ये तत्कालीन राजकीय विचार, व्यापार, विविध उत्सव, खेळ, ग्रामीण जीवन, निसर्ग – परिसर इत्यादी घटकांचे वर्णन या ग्रंथात येते. शिवाय, तत्कालीन ग्रामीण जीवन संस्कृतीचे दर्शनही या ग्रंथांमधून होते, असे मत डॉ. महावीर शास्त्री यांनी व्यक्त केले.
ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाड्.मय संकुलातील मराठी विभाग आयोजित “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा”निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.मृणालिनी फडणवीस होते.
डॉ. शास्त्री पुढे म्हणाले की, या ग्रंथामध्ये हाल राजाच्या काळातील विविध कवी, स्त्री-पुरुष, ग्रामस्थांनी गाथेतील काव्य रचना केली आहे. या काव्यातील भाषेचे सौंदर्य अप्रतिम आहे. या ग्रंथाला पूर्वी ‘गाथा कोश’ असेही म्हटले जात असे. तसेच, जी भाषा प्रवाही व नाविन्य गोष्टी स्वीकारत असते ती कधीही मरत नाही. आणि मराठी भाषा ही बदल स्वीकारून प्रवाही व अस्तित्व टिकवणारी भाषा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जे प्रयत्न केले जात आहेत ते गाथा सप्तशती या अभिजात ग्रंथाच्या आधारे केले जात आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी भाषेचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे, असे मत अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. भाषा ही माणसांमध्ये नातं आणि माणुसकी निर्माण करत असते. मराठी भाषा देशातील विविध प्रांतात बोलली जाते. तसेच महाराष्ट्राच्या सीमारेषा इतर राज्यांना लागून आहेत. त्यामुळे मराठी बोलींचा सांस्कृतिक अभ्यास व्हावा, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाषा व वाड्.मय संकुलाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. ‘गाथा सप्तशती ‘ हा ग्रंथ अभिजात भाषेची ओळख करून देणारा ग्रंथ आहे. या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त मराठी भाषेचा इतर भाषेशी असलेला संबंध या अनुषंगाने विविध व्याख्यानांचे आयोजन केले आहे. प्रस्तुत विद्यापीठातील भाषा व वाड्.मय संकुलामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना पदवीत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ.दत्ता घोलप यांनी मानले. तांत्रिक सहकार्य श्रुती देवळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय राहूल उपाध्ये यांनी करून दिला. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विविध संकुलातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकुलातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.