आचार्य दोंदे : बाबासाहेबांचा निष्ठावान अनुयायी
मिलिंद मानकर यांची स्पेशल स्टोरी
जुन्या काळातील थोर समाजसेवक आचार्य मो.वा. दोंदे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी होते. बाबासाहेबांच्या विचारांची बाग फुलविणारे ते महान कर्मयोगी होती. बाबासाहेबांच्या हस्ते त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेतली होती. आज, ४ ऑगस्ट आचार्य दोंदे यांची १२७ वी जयंती त्यानिमित्ताने …
थोर समाजसुधारक आचार्य मोरेश्वर वासुदेव दोंदे यांचा जन्म ४ ऑगस्ट १८ ९ ४ रोजी ठाणे मुंबई येथे झाला . लहानपणीच पितृ सुखाला पारखे झाल्यानंतर त्यांना जीवनाशी कठोर संघर्ष करावा लागला. सोळाव्या वर्षीच त्यांना समाजकार्याची गोडी निर्माण झाली. अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना क्रिकेटची अतिशय आवड होती . विल्सन कॉलेजच्या क्रिकेट स्पर्धेत ते हिरीरीने भाग घेत. विल्सन कॉलेजमधूनच त्यांनी बीएची पदवी मिळविली. १९१८ ते १ ९ ५४ या काळात त्यांनी परळ मुंबईच्या आर.एम. भट हायस्कूलचे प्राचार्यपद भूषविले. १९४५ साली अ.भा. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षकांचा संप यशस्वीरीत्या घडवून आणला. सेवानिवृत्त झाले तेव्हा मिळालेली संपत्ती त्यांनी वेगवेगळ्या प्राथमिक शाळेला मदत म्हणून दिली . मुंबई महानगर पालिकेचे ते अनेक वर्षे सदस्य होते. १९५७-५८ साली ते महापौर होते . आचार्य दोंदे हे डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक निष्ठावंत सहकाऱ्यांपैकी एक होते.
बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’चे ते विश्वस्त होते . त्यांनी अविश्रांत शैक्षणिक कार्य करून बाबासाहेबांचा मानवतावादी विचार सर्वदूर पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य केले. ते प्रभावशाली वक्ते होते. अनेक सभा – संमेलनातून त्यांनी डॉ. बाबासाहेबांवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. डॉ. मुकुंदराव जयकर यांच्या उपस्थितीत डॉ . आंबेडकर जयंती सुवर्ण महोत्सव ‘ १९४२ साली साजरा करण्यात आला होता . त्याचे ते अध्यक्ष होते . ते म्हणाले, ‘डॉ . आंबेडकर भारतातील शककर्त्या पुरुषांपैकी एक होते . ते पुढे म्हणाले , बाबासाहेब आंबेडकर ही भारतीय राजकारणातील एक प्रचंड शक्ती आहे . ही शक्ती गेल्या तीन वर्षात किती प्रभावी ठरली हे भारताचा इतिहास सांगितल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती डॉक्टर साहेबांनी संपादन केली ती त्यांनी आपल्या उज्वल व्यक्तिमत्त्वावर संपादन केली.
आज आपल्या देशात एवढे व्यक्तिमत्त्व गाजविणाऱ्या बोटावर मोजण्या इतपत व्यक्ती दिसून येतील . डॉक्टर साहेबांचे व्यक्तिमत्त्व अस्पृश्य समाजामध्ये विभूतीपूजेच्या भावनेने भारून टाकणारे जरी असले तरी स्पृश्य समाजामध्ये त्यांची निर्भयता, बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता या गुणाबद्दल प्रत्येक क्षणी आदर वाढत गेला आहे. सर्व गोष्टीचा विचार करता एक प्रश्न येथे उभा राहतो तो म्हणजे डॉक्टर साहेबांचे एवढे मोठे श्रेष्ठत्व कशात आहे ? अनेक कारणे असू शकतील. परंतु सर्वात प्रमुख कारण म्हणजे त्यांचे व्यासंग हे होय . परळच्या आर.एम. भट हायस्कुलात गुरुवर्य दोंदे यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि सौ . माईसाहेब आंबेडकर यांचा १९४८ साली सत्कार समारंभ घडवून आणला. १९५० साली बाबासाहेबांच्या ‘ राजगृह ‘ निवासस्थानी २५,००० ग्रंथाची क्रमवार सूची तयार करण्यासाठी त्यांनी जिवापाड परिश्रम घेतले होते. ते म्हणाले , ‘शेकडो पुस्तके कायद्यावरील आहेत ‘ ती हिशेबात घेऊ नका.’ असे डॉक्टर साहेबांनी सांगितले म्हणून ! या मोजदादीत त्या पुस्तकांचा समावेश झालेला नाही.
पंचवीस हजार ग्रंथराजांचा अत्यंत मौल्यवान संग्रह ! एका व्यक्तीने केलेला हा संग्रह ! विशिष्ट ध्येयाने केलेले संकलन ! एका जगप्रसिद्ध विद्वानाने केला हा ग्रंथभांडार ! ‘ नहि ज्ञानेन सदृशे पवित्र इह विद्यते ‘ यापेक्षाही इंग्रजी म्हण Knowidge is Power हेच डॉ. आंबेडकरांच्या जीवनाचे सार आहे . एकदा काही कॉलेज विद्यार्थी डॉक्टर साहेबांकडे आले होते . त्यांच्याशी बोलताना ते म्हणाले, ” तुम्ही कॉलेजमधील तरुण आहात . तुमच्यापैकी काहीजण पदवीधरही आहेत . तुम्ही स्वतःला शिकलेले समजता, सुशिक्षित समजता परंतु तुमच्यामध्ये आणि न शिकलेल्यामध्ये काय फरक आहे ते सांगाल का मला ? मी सांगू ? शिक्षण घेतल्यानंतर जर तुम्हाला वाचनाची गोडी नसेल , तुम्ही हातात पुस्तक धरीत नसाल , घरी तुमची स्वतःची पाच – दहा पुस्तके नसतील , वाचनाचा व्यासंग तुमचा जर नसेल तर मी तरी तुम्हाला सुशिक्षित बिलकुल मानायला तयार नाही . ” केवढा बहुमोल उपदेश आहे हा !
बौद्धजन पंचायत समिती मुंबई या संस्थेने बांधावयास घेतलेल्या सभागृहाचा कोनशिला समारंभ २ एप्रिल १९५८ रोजी जेरबाई वाडिया रोड , भोईवाडा नाका परेल येथील संस्थेच्या जागेत पार पडला . कोनशिला आचार्य दोंदे यांच्या हस्ते बसविण्यात आली. त्यावेळी ते मुंबईचे महापौर होते . नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी बाबासाहेबांच्या हस्ते धम्मदीक्षा घेतली. धम्मदीक्षेने पुलकित होऊन त्यांनी बाबासाहेबांना मोठ्या आत्मीयतेने पत्र लिहिले . “ परमपूज्य डॉक्टर साहेब सादर प्रणाम. आपण पुन्हा इतिहास घडविलात ! आपण केलेला बुद्धधर्माचा स्वीकार ही माझ्या मते जागतिक महत्त्वाची घटना आहे . ‘ मुंबईच्या दादर चैत्यभूमीवर ७ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांना भावपूर्ण सुमनांजली वाहताना आचार्य दोंदे अगदी सद्गदित झाले होते . बाबासाहेबांच्या असंख्य आठवणीने त्यांचा कंठ दाटून आला होता . त्यांचे दोन्ही डोळे अधूंनी डबडबलेले होते . त्याच अवस्थेत त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
ते म्हणाले , “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी कोणती उपमा देऊं ? सागराची की पर्वताची ? त्यांच्यासारखी अष्टपैलू व्यक्ती भूतकाळात जन्मास आली नाही . वर्तमानकाळात दुसरी कोणी दिसत नाही . भविष्यकाळात अशी व्यक्ती निर्माण होईल की नाही हे मला सांगता येणार नाही . त्यांनी भारतीय राज्यघटना दिली . त्यांनी भारताला अशोक चक्राची देणगी दिली . आपले जे अशोक चक्राचे राष्ट्रीय निशाण आहे त्या राष्ट्रीय निशाणाची कल्पना डॉ . आंबेडकरांची . त्यांनी भारताला दिलेली ही बहुमोलाची देणगी आहे . जगात आता अणुशक्ति निर्माण झालेली आहे . डॉक्टरसाहेबांनी विचारांची , सिद्धांतांची अणुशक्ती निर्माण केली आहे . ही प्रभावी अणुशक्ती म्हणजे सात कोटी अस्पृश्य बांधवामध्ये निर्माण केलेले चैतन्य होय . ” डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्ती चळवळीत सक्रिय असतानाच आचार्य मो.वा. दोंदे यांचे मुंबईत ७ ऑक्टोबर १९६२ रोजी निधन झाले . निष्काम कर्मयोगी , आदर्श शिक्षक , समाज प्रबोधनकार , आंबेडकर विचारांवर अलोट श्रद्धा ठेवणारे आचार्य दोंदे आजही इतिहासातून संवाद साधतात, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व महामानवाच्या सान्निध्याने फुलून आले . १२७ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन.
– मिलिंद मानकर , नागपूर
(मो . 8080335096)