आंबेडकरी पत्रकारितेचा बुलंद आवाज हरपला, दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे यांचे निधन

मुंबई : विशेष प्रतिनिधी
आपल्या परखड लेखणीने अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर प्रहार करणारे, आंबेडकरोत्तर पत्रकारितेत स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे बंडखोर पत्रकार, दैनिक सम्राटचे संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक बबन कांबळे यांचं निधन झाले आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सडेतोड पत्रकार, विद्वान संपादक, बहुजन चळवळीचा मार्गदर्शक हरपला अशी भावना महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे.
आज सकाळी ६.०० वाजता ठाणे येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. अंतिम दर्शन रुस्तुमजी टॉवर, माजिवाडा,ठाणे येथे होईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
संपादक बबन कांबळे यांनी यापूर्वी दैनिक नवाकाळमध्ये वरिष्ठ संपादक या पदावर काम पाहिले आहे. सडेतोड पत्रकारितेमध्ये त्यांचा राज्यात हातखंडा होता. नवाकाळमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतलेल्या दैनिक वृत्तरत्न सम्राट 2003 साली काढून राज्यातील आंबेडकरी समाजाला दिशा देण्याचे काम केले. दैनिक सम्राटचे अंक वाचण्यासाठी लोक वाट पाहायचे.
बबन कांबळे हे नोव्हेंबर 2004 साली वाचक मेळाव्याच्या निमित्ताने सोलापुरात आले होते. 17 फेब्रुवारी 2004 साली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सोलापुरात सम्राट पेपर सुरू केला होता, ती बातमी पहिल्या पानावर आली होती.
माय माऊल्यांनी मंगळसूत्र सम्राटसाठी दिली
दैनिक सम्राट हे वृत्तपत्र आंबेडकरी जनतेसाठी एक आधारस्तंभ बनले होते. सम्राट सुरू होताच प्रस्थापित पत्रकारितेत खळबळ माजली. महाराष्ट्रात जिथे कुठे अन्याय अत्याचार होईल तेथील सविस्तर आणि रोखठोक वार्तांकन दैनिक सम्राटमध्ये प्रसिद्ध होत असे.
दैनिक सम्राटचे राज्यभरात वाचक मेळावे आयोजित करण्यात येत होते. या वाचक मेळाव्यात आपला सम्राट पेपर वाढावा, त्याला हातभार लावावा या हेतुने महिलांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र दान केली. दैनिक सम्राटने एक झंझावात निर्माण केला होता.
जाज्वल्य पत्रकारिता
दैनिक सम्राटमध्ये आपला लेख प्रसिद्ध व्हावा असे सर्व साहित्यिकांना वाटत असे. ज्याचा लेख किंवा इतर लेखन साहित्य प्रसिद्ध होई त्याला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत असे. हे वृत्तपत्र आक्रमक आणि सडेतोड बातम्यांसाठी अल्पावधीत लोकप्रिय झाले.
निर्भिड संपादक
बबन कांबळे यांनी या वृत्तपत्राला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली होती. बबन कांबळे यांचे धारधार अग्रलेख अन्यायावर प्रहार करीत होते. आंबेडकरी राजकारणाला आलेली मरगळ झटकून टाकण्याचे काम दैनिक सम्राटच्या माध्यमातून बबन कांबळे यांनी केले.
खपाचा उच्चांक
दैनिक सम्राट हे असे वृत्तपत्र होते की या वृत्तपत्राने खपाचा उच्चांक गाठला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यात हे वृत्तपत्र पोहोचत होते. एखाद्या दिवशी अंक उशिरा आला तरी वाचक अस्वस्थ होत असत. राज्यातील दुर्गम भागात मागील दोन चार दिवसाचे जुने अंकही अत्यंत तन्मयतेने वाचले जात होते.
वाचनीय विशेषांक
दैनिक सम्राटने प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिनी तसेच महापुरुषांच्या जयंतीदिनी खास विशेषांक प्रसिद्ध केले. या अंकाचीही मोठी चर्चा झाली. संग्रही असे हे अंक होते.