अभिव्यक्तीला नवे कोंदण पुरवणारा ‘नब्ज’ ईदोत्सव विशेषांक
ब्लॅक इंक मीडियाची ईदनिमित्त वैचारिक मेजवानी
दिवाळी हा जसा अंधाराचे जाळे भेदून नवी उमेद देणाऱ्या प्रकाशदिव्यांचा सण, तसाच रमजान ईद हा मनात दाटलेले अंधाराचे जाळे फेटणारा, अर्थात मनाची शुद्धी घडवून आणत जगण्याला नवचैतन्य देणारा असा सण आहे. दिवाळी हा सण समाजाच्या सर्वांगिण भरभराटीच्या शक्यता घेऊन येतो. तसा ईदचा सणही समाजात त्याग, करुणा, सहवेदना, संयम, सहिष्णूता आणि औदार्याची बीजे रोवणारा असतो. यात आत्मशुद्धी तर आहेच, पण आत्मज्ञानाची अनुभूती आहे, जीवसृष्टीचा सन्मान आहे, काठोकाठ प्रफुल्लता आहे, उत्सवाचा साज तर आहेच, आहे… दिवाळीप्रमाणेच ईद हा देखील समाजाला जोडणारा, समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा उत्सव आहे. या उत्सवाच्या होणाऱ्या आनंदातून व्यक्त होऊ पाहणाऱ्यांच्या भाव-भावनांना शब्दरुप देण्याचा, अभिव्यक्तीला नवे कोंदण पुरवणारा आगळावेगळा प्रयत्न म्हणजे ‘नब्ज’ हा ईदोत्सव विशेषांक…
यात सांस्कृतिक-सामाजिक सरमिसळ आहे. मुस्लिम समाजाच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. हिंदू-मुस्लिम-शीख-बौद्ध-ख्रिश्चन या धर्मांतल्या परस्पर सौहार्दाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेध आहे. वर्तमानातल्या सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक-आर्थिक प्रश्नांची साकल्याने केलेली उकल आहे. परस्परपूरक ठरत गेलेल्या कला-संस्कृतीच्या अंगाने बहरत गेलेल्या काळाचा रंगबेरंगी कोलाज आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, नब्ज हा समाज म्हणून जपलेल्या माणुसकीला, माणसामाणसांतल्या अंगभूत चांगुलपणाला दिलेला समयोचित असा प्रतिसाद आहे.
महाराष्ट्राला दिवाळी अंकांच्या रुपाने १०८ वर्षांची साहित्यिक-सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. त्याच समृद्ध परंपरेचे बोट धरून मुस्लिम आणि इतर धर्मियांच्यात सांस्कृतिक आणि साहित्यिक एकात्मतेची भावना रुजवणे, हा या ‘नब्ज’ ईद विशेषांकामागील आमचा उद्देश आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हा अंक अभिव्यक्तीच्या नव्या वाटा खुल्या करत, दोन समाजांची मने जोडणारा, परस्परांच्या विचार आणि भावविश्वाला श्रीमंती देणारा संग्राह्य ऐवज आहे… युवा पत्रकार मिनाज लाटकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या आणि ब्लँक इंक मिडिया हाऊसची निर्मिती असलेल्या नब्ज अंकाचे संपादन ज्येष्ठ संपादक प्रशांत पवार आणि शेखर देशमुख यांनी केले आहे. युवा कादंबरीकार अविनाष उषा वसंत यांनी संपादन सहाय्य केले आहे.
‘नब्ज’चे खास आकर्षण
जावेद अख्तर अनिल अवचट, अरूण म्हात्रे, शेखर देशमुख, फ. म. शहाजिंदे, मुफीद मुजावर, रझिया पटेल, अर्शद शेख, डॉ. शमशुद्दीन तांबोळी, संतोष आंधळे, प्रमोद चुंचुवार, रमेश रावळकर, उर्मिला पवार, जतीन देसाई, जितेंद्र घाटगे, हिना खान, इंद्रजीत खांबे, श्रृती गणपत्ये, हुमायून मुरसल, प्रसाद लाड, शर्मिष्ठा भोसले, विशाखा शिर्के, प्रा.डॉ. अरुण वाहूळ, मुबारक अली, अलीम रंगरेज, इर्शाद बागवान, सानिया भालेराव, नागनाथ खरात या मान्यवर लेखकांनी अंकात आपले योगदान दिले आहे. तर कवितांच्या विभागात दिशा शेख, शमिभा पाटील, स्वप्निल चव्हाण, साहील कबीर, सागर कांबळे, प्रदीप कोकरे, प्रेशित सिद्धभट्टी, विशाखा विशाखा, सुरेखा पैठणे, श्रीकांत ढेरंगे आदी ताकदीचे कवी सहभागी झाले आहेत. गजलचा एक नवा पायंडा अंकात समाविष्ट करण्यात आला असून त्यात मुबारक शेख, साबिर सोलापुरी, सदानंद डबीर, शोभा तेलंग, डॉ. स्नेहल कुलकर्णी, आबिद मुनशी, सिद्धार्थ भगत, श्रीकृष्ण राऊत, वैभव वसंतराव कुलकर्णी, डॉ. राम पंडीत, विनय मिरासे, कलीम खान, सुनंदा पाटील हे गजलकार सहभागी झाले आहेत.
१८० पानी असलेल्या या अंकाचे मुल्य १८० रुपये असून अंकाची नोंदणी करण्यासाठी ९९३०८०३३२८ आणि ७०५८९४००५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.