अबब… ५० कांड्याचा ऊस, एकरी १३० टन उत्पादन
माळशिरसच्या शेतकऱ्याने केली जादू
स्पेशल स्टोरी / डॉ.नाना हालंगडे
तेलकट मर किड रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकीकडे डाळिंब नष्ट होत चालले असताना कोळेगाव ता. माळशिरस येथील प्रयोगशील शेतकरी शहाजी दुपडे यांनी जैविक सेंद्रिय, रासायनिक खते व पाण्याचे योग्य नियोजन करून सुमारे अडीच हेक्टर शेतीत लागण केलेल्या ८६०३२ या वाणाच्या ऊसातून एकरी १३० टन उत्पन्न घेऊन विक्रम केला आहे. सध्या शेतातील सुमारे ५० कांड्यांचा उंचावलेला हिरवागार ऊस शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
कृषीप्रधान भारत देशात शेतकरी कितीही संकट आली तरी कधीही खचून न जाता संकटावर मात करून शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेती व फळ पिकातून अधिक अधिक उत्पन्न घेण्याकडे भर असतो. एकीकडे डाळिंब बागा तेल्या मर कुजवा रोगामुळे उध्वस्त होत आहेत तर शेतकरी पीक पद्धत बदलून नवनवीन प्रयोग करीत शेती पिकांबरोबर इतर फळ पिके लागवडीकडे वळला आहे.
अशाच कोरेगाव येथील प्रयोगशील शेतकरी शहाजी भोजलिंग दुपडे यांनी त्यांच्याकडील अडीच हेक्टर शेतात ८६०३२ या वाण असलेला ऊस लागण केला. लागणी नंतर उसाला जैविक सेंद्रिय व रासायनिक खतांचे संतुलन राखून पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले.
लागवडीसाठी एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च झाला. सध्या त्यांच्या शेतातील ५० कांड्यावर पोचलेल्या हिरव्यागार उसाचे ५ किलो ग्रॅम वजन आहे. त्यांनी अवघ्या सहा गुंठ्यात 20 स्तनाचे उत्पन्न घेतले आहेत तर सरासरी एकरी १३० टन विक्रमी उत्पन्न मिळणार आहे. त्यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी ऊस शेतीचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास निश्चितच ऊस लागवडीतून अधिकाधिक उत्पन्न मिळेल असे त्यांनी सांगितले.
चांगली उत्पादनक्षमता असलेला वाण
उसाच्या को-86032 या एकाच वाणाखाली राज्यात आजतागायत 50 टक्के व देशपातळीवर 46 टक्के क्षेत्र असून हा वाण शेतकरी आणि कारखानदार यांच्या पसंतीस पडला आहे.
हेक्टरी 250 ते 300 टन उत्पादनक्षमता, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा अशा चांगल्या गुणधर्मामुळे या वाणाने साखर कारखानदारीत महाराष्ट्रात आणि देशात मोठी आर्थिक क्रांती घडवून आणली आहे.
त्यामुळे हा वाण ‘वंडरकेन’ म्हणून देशभर ओळखला जातो. म्हणून सदरचे वर्ष या संशोधन केंद्राने को-86032 वाणाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
वाणाचा प्रवास
को-86032 वाणापूर्वी राज्यामध्ये को-740 आणि को-7219 या वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. 1956 मध्ये प्रसारित केलेल्या को-740 वाणाने 40 वर्षे राज्यात पूर्ण केली. तथापि, काणी रोगामुळे आणि सुरुवातीला कमी उतारा असल्यामुळे हा वाण मागे पडला.
को-7219 हा वाण त्यावेळी ऊस आणि साखरेच्या उत्पादनामुळे पसंतीस पडला. परंतु, उशिरा तोडणीमध्ये याचे ऊस आणि साखर उत्पादन कमी होऊ लागल्याने नवीन वाणाचा शोध सुरू झाला. को-86032 या वाणाचा संकर कोईम्बतूर येथे करण्यात आला आणि त्यानंतर संशोधनाचे काम पाडेगाव येथे पार पडले.
वाणाचा शोध
हा वाण को-62198 आणि कोसी-671 या वाणाच्या संकरातून निर्माण करण्यात आला. को-86032 या वाणाच्या अखिल भारतीय पातळीवरील द्विपकल्पीय विभागात वेगवेगळ्या संशोधन केंद्रांवर 23 चाचणी प्रयोग, पाडेगाव येथील स्थानिक पातळीवर 7 प्रयोग, विभागवार 23 प्रयोग आणि शेतकर्यांच्या शेतावर 27 प्रात्यक्षिके घेण्यात आली.
या सर्व चाचण्यांमध्ये ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनात हा वाण तूल्यवान 7219 पेक्षा अनुक्रमे 15.7 आणि 16.7 टक्क्यांनी सरस आढळून आला.