अबब! लिंबाच्या झाडावरही रोगाचा प्रादुर्भाव
महाकाय झाडेही वाळू लागली
सांगोला / एच. नाना
गतवर्षापासून रोगराई वाढली आहे. अशातच कोरोनाने मानवी जीवन उद्धवस्त केले आहे. अवकाळी पाऊस तर बळीराजाला मारत आहे. फळबागाही उद्धवस्त झाल्या, पण जे झाड रोग घालविते, त्या झाडालाचं रोगाने ग्रासले आहे. मोठमोठाली लिंबाची झाडे मागील महिनाभरापासून वाळू लागली आहेत. सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र हे चित्र दिसून येत आहे.
लिंबाचे झाड हे कोठेही बिनापाण्याचे येत असून, याच झाडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच लिंबाला सध्या रोगाने ग्रासले आहे. झाडांची पाने जागेवरच जळत आहेत. तर काही ठिकाणी झाडेही वाळून गेली आहेत.
हेच लिंबाचे झाड सावलीसाठी उत्तम प्रकारचे असून, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ही झाडे आहेत. दररोज सकाळच्या प्रहरी लिंबाच्या काड्यानी दात घासणे, पाल्याने धुराडी देणे ,जखमेवर साल लावणे यासह अनेक कामासाठी लिंबाचा उपयोग केला जातो.
लिंबापासून लिंबोली तेल, लिंबोळी पेंड तयार केली जात असून, ग्रामीण भागातील महिला लिंबोळ्या गोळा करून आर्थिक गरजाही भागवितात. याच लिंबाच्या झाडांचा मोहर मकर संक्रांतीला काढा करून, खाल्ला जातो.
असे बहुगुण औषधी असलेल्या लिंबाच्या झाडावर सध्या अज्ञात रोगाने घाला घातलेला आहे. झाडे जाग्यावर वाळून गेली आहेत. यामुळे ग्रामीण भागात या लिंबावरील रोगाचीच चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.