अन् मरीआईवाल्या मुलांची दिवाळी नव्या कपड्यात
अन्नसुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांचे दातृत्त्व

सांगोला/ नाना हालंगडे
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीतही देशातील भटका समाज विकासापासून कोसो दूर, अंधारात चाचपडत आहे. दिवाळीचा झगमगाट आणि नवे कपडे यांच्या नशिबी नाहीच. देशातील ही स्थिती आपण बदलू शकत नसलो तरी आपल्या आजूबाजूच्या भटक्या समाजासाठी काहीतरी निश्चित करू शकतो या हेतूने “भाईंची देवराई” या व्हॉटस्ॲप ग्रुपवर आवाहन करण्यात आले आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

समाजातील दात्यांनी पुढे येत भटक्या प्रवर्गातील मरीआईवाले समाजाची यंदाची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. सांगोला तालुक्यातील सुपुत्र तथा कोल्हापूर येथे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी या समाजातील विद्यार्थ्याना नवे कपडे घेऊन दिले. येत्या दोन दिवसांत मरीआईवाले समाजाच्या पालावर जाऊन त्यांना फराळ देण्यात येणार आहे.

त्याचे झाले असे..
मरीआई गाडेवाल्यांची मुलं शिक्षण घेतात डिकसळ (ता.सांगोला) आश्रमशाळेत.. तेथे शिक्षण अन् निवासाची सोय उत्तम आहे.. या मुलांनी आपली दिवाळी नव्या कपड्यात असावी असेच काहीसे बोलून दाखविले. याचे आवाहन “भाईंची देवराई” या व्हॉटस्ॲप ग्रुपवर केले असता कोल्हापूर येथे कार्यरत असलेले अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे यांनी या सर्वांनाच नवीन कपडे देण्याचा शब्द दिला अन् त्यांची दीपावली गोड केली.
अन्नसुरक्षा अधिकारी डॉ.मंगेश लवटे हे सामाजिक भान असलेले अधिकारी आहेत. ते सतत सांगोलाच्या मायभूमिसाठी सर्वांनाच मदत करतात. असेच या मरीआई गाडेवाल्यांच्या मुलांच्या बाबतीत झाले. ही मुलं कडलास येथील झोपडीत वास्तव्यास आहेत. तर शिक्षण मात्र डिकसळ येथील निवासी आश्रमशाळेत घेत आहेत.
शाळा यांना सर्वच सुविधा पुरविते, पण दीपावलीला सर्वच पोरांसारखी रंगीत कपडे आम्हाला पण पाहिजेत असे काहीसे त्यांनी बोलून दाखविले. याबाबतचे आवाहन “भाईंची देवराई” या व्हॉटस्ॲप ग्रुपवर केले असता मदतीचा ओघ सुरू झाला अन् याच मरीआई गाडेवाल्या मुलांची दिवाळी डॉ.लवटे यांच्यामुळे गोड झाली.
गेली सात वर्षापासून हीच मुलं याच शाळेत शिक्षण घेत आहेत. यातील सुनील रायाप्पा कोळी व अमर अनिल कोळी हे दोघे सातवीत शिकत आहेत. करण रायाप्पा कोळी हा नववीत शिकत आहे. संजय कोळी सहावीत तर संजू कोळी तिसरीत शिकत आहे. अशी ही गाडेवाल्यांची मुलं शिक्षणात तरबेज आहेत.
ना कधी आजारी वा कधीही अभ्यासात मागे. पण येथे गरिबी आडवी येत आहे. अशाच या गोंडस मुलांची दिवाळी गोड व्हावी म्हणून डॉ.लवटे यांनी मदतीचा हात देत नवा पोशाख त्यांना दिला. या नव्या कपड्यांचे वाटप आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम भुसनर यांच्या हस्ते तर अण्णा चौगुले, पिराजी वाघमोडे, सोपान करांडे, दादा करांडे यांच्या उपस्थित करण्यात आले.
‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास
सांगोला पाऊस : शहाजीबापूंच्या मंडलात पावसाचा हात आखडता, संगेवाडीत सर्वाधिक बरसात