अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीपासून सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, करमाळा व माळशिरस तालुके वगळले
पालकमंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार : भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख
- हेही वाचा : प्रस्थापित व्यवस्थेला टक्कर देणारा “जय भीम”
सांगोला : थिंक टँक न्यूज नेटवर्क
राज्यात शेतकरी हिताच्या योजना राबवायच्या नाहीत आणि आहे त्या योजनाही राजकारण करून बंद पाडत शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा आघाडी सरकारचा कट उघड झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना फक्त 80 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. तर उर्वरित सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, करमाळा व माळशिरस हे पाच तालुके वगळले आहेत. याबाबत पुनर्विचार करावा अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिला आहे.
- हेही वाचा : नरक चतुर्दशीदिवशी ‘अशी’ करा पूजा
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वच तालुक्यातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. शेतकरी सरकारकडून मदतीची अपेक्षा करीत असताना आघाडी सरकारने मात्र शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीपासून जिल्ह्यातील पाच तालुके वगळल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
- हेही वाचा : ग्रामसभेत मतदारयादीचे वाचन होणार
जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, करमाळा व माळशिरस या तालुक्यात दीड महिन्यात सतत पाऊस पडला आहे. वरील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात आजही पाणी असून काही ठिकाणी पाझर सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके पाण्यात कुजून गेली, फळबागा मुळ्या कुजल्याने जागेवरच झाडे वाळू गेली.
तर काढलेली पिके घरापुढे भर पावसात सापडल्याने जागेवरच कुजून गेली. वीज बिले माफ करण्याऐवजी ऊसाच्या बिलातून वीज बिल वसुलीचा सरकारने घाट घातला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 40 हजार रुपये मदत देण्याची मागणी भाजपने केली असताना सरकारने तुटपुंजी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची चेष्टा केली. तसेच शेतकऱ्यांनी उजनीचे पाणी मागणीचे अर्ज भरू नयेत अशी पद्धतशीरपणे मोहीम राबवून सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे 16 दशलक्ष घनमीटर पाणी ना.भरणे यांनी पळवले. राज्यातील जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळासही सरकारने वेठीस धरले असून महामंडळास तोट्यात ढकलून एसटीच्या खासगीकरणाचा डाव नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी 65 मिमी पाऊस झाला पाहिजे असा निकष आहे. परंतु सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, करमाळा व माळशिरस या तालुक्यात 65 मिमी पेक्षाही जास्त पाऊस पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पाच तालुक्यात काही ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे नसल्याचे तर काही ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे नादुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना महसूल विभागाने अंदाजे आकडेवारी शासनाला कळवल्याने मदतीपासून पाच तालुके वगळल्याने शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडी सरकारविषयी तीव्र नाराजी पसरली असून याची किंमत भविष्यात आघाडी सरकारला मोजावी लागेल. धक्कादायक बाब म्हणजे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातील घटक आहेत असे सांगोल्यात येणारा शिवसेनेचा प्रत्येक मंत्री वारंवार सांगत आहेत. तर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरातील घटक आहेत असे करमाळा तालुक्यात सांगितले जाते. असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगोला, करमाळा तालुक्यासह मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस या अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांना मदत देण्यासाठी का? पाठ फिरवली हा संशोधनाचा विषय आहे.
अजूनही वेळ गेली नाही, आघाडी सरकारने सोलापूर जिल्ह्यातील वगळलेल्या पाच तालुक्यातील शेतीचे सरसकट पंचनामे ग्राह्य धरून अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना द्यावी. अन्यथा आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलने छेडले जाईल. व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिला. तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भूमिका जिल्ह्यासाठी सूडभावनेची असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा शासनापर्यंत न पोहोचवल्यास या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिला आहे.