अंध:कारमय गावकुस आणि बधीर समाजमन
डॉ. कालिदास शिंदे यांचा व्यथित करणारा लेख
अगोदरच विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमातीमधील वंचित बांधव या महामारीमुळं कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत. दोन वेळ पोटाला अन्न मिळेल की नाही या विवंचनेत कसंबसं जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. महामारीच्या सुरुवातीच्या काळात बरेच सामाजिक कार्यकर्ते, संस्था, उद्योजक, सर्व क्षेत्रांतील मान्यवर, व्यक्ती, शासन यांनी वंचित समाज, मजूर वर्ग यांना मदत देऊन मोलाचे सहकार्य केले होते. परंतु, लॉकडाऊन काही बाबतीत शिथिल झाल्यानंतर मात्र शासनाने विशेष रेशन मदत देणे थांबवले. फक्त काही ठराविक रेशनकार्ड धारकांना रेशन मिळत आहे. बाकी केशरी रेशनधारक यांना रेशन मिळणे बंद झाले आहे. आजही महामारीचे सावट आहे. परंतु शासन व समाज यांच्या माध्यमातून येणारी सामाजिक मदत थांबलीय.
यात वीजबिल माफ व्हावे, सवलत मिळावी ही मागणी होत होती. परंतु याबाबात शासन यंत्रणेकडून कोणतीही सवलत मजूर, गरीब, मागास जाती जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी जमाती यांना दिली गेली नाही. त्यामुळे अगोदरच विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जाती अंध:कारमय जीवन जगत आहेत. त्यात त्याच्या पालातील, घरातील light connection तोडून वीज पुरवठा खंडीत करून अंधारात जीवन जगण्यास भाग पाडले आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. वृध्द, लहान मुले यांना अंधारात जीवन जगणे असह्य होत आहे. परंतु, या निर्दयी प्रशासनास याचे काही घेणे-देणे नाही. तांडा, पाल, बिऱ्हाड यावर संध्याकाळी हा वंचित समाज अन्न तयार करून तर खाणार कसा याचा विचार केला का त्यांनी? त्यांची पैशांअभावी वीज तोडली गेली आहे. कोण म्हणतेय असमानता नाही. हे कशाचे उदाहरण आहे?
याला अपवाद माझे कुटुंबही नाही. गेल्या एका वर्षापासून आई-वडिल, भाऊ, त्याचे कुटुब घेऊन गावी थांबण्यास भाग पडले आहे. आता भावांची मुले शाळेत जाऊ लागली होती. अभ्यास करत होती. ऑनलाईन शिक्षण मोबाईलवर घेत होती. आता लाईट नसल्याने मोबाईल रिचार्ज करायचा कसा हा प्रश्न पडला आहे. या मुलांचे ऑनलाईन शिक्षण लाईट अभावी थांबले आहे.
सध्या कुटुंबियांना पारंपरिक नाथाचे डवरी गोसावी म्हणून भिक्षा मागायला जाता येत नाही. वडिलांचे वयही झाले आहे. 95 वर्षाची आजी आहे. तिला रक्तदाबाचा त्रास आहे. वडील अंकुश आप्पा शिंदे (रा. दिघंची, ता.आटपाडी, जि. सांगली) हे 67 वर्षाचे आहेत. त्यांनाही रक्तदाब व पॅरालिसिसचा त्रास आहे. आईला वाताचा त्रास व बीपी आहे. काल वडिलांच्या नावी असलेले वीज कनेक्शन महावितरणवे तोडले. वरिष्ठ अधिकारी नांगरे साहेब यांना फोन करून खरी परिस्थिती कथन केली की, आजी, आई, वडिल यांना बीपी चा त्रास असल्याने अस्वस्थ वाटते. त्यामुळे लाईटची गरज आहे. थोडी परिस्थिती व्यवस्थित झाल्यावर लाईट बिल भरतो परंतु त्यांनी अद्यापपर्यंत लाईट कनेक्शन जोडलेले नाही. तसेच आमच्याजवळ सध्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर येण्याचा काही पर्याय उपलब्ध नसल्याने आज किमान माझे स्वतःच्या नावावर नवीन कनेक्शन द्या अशी विनंती वायरमन यांना केली. त्यांनी सध्या वसूली सुरू आहे. त्यामुळे नवीन कनेक्शन 1 एप्रिल 2021 पर्यंत देता येणार नाही व मीटर शिल्लक नाहीत,असे सांगितले.
मी पालात जन्म घेतला आहे. या सामाजिक परिस्थितीत जन्म घेणे हाच आमचा गुन्हा ठरत आहे. माझे सध्या अंध:कारमय जीवनातून प्रकाशमय जीवन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सध्याही संघर्ष सुरूच आहे. ही व्यवस्था मात्र आम्हाला जास्त अंधारात घालत आहे. किमान माझ्या नावाने तरी वीज कनेक्शन दोन-तीन दिवसांत शासकीय प्रक्रिया करून मिळावे, ही विनंती मी करत आहे. सध्या वडिल बिकट आर्थिक व शारीरिक, मानसिक परिस्थितीत जीवन जगत असल्याने लाईट बिल भरू शकत नाहीत. हे वास्तव आहे.
बाकी वंचित समाज बांधवांची एकंदर परिस्थिती किती भयंकर आहे. याला कोण कारणीभूत आहे. याची कोण जबाबदारी घेणार आहे? यावर मीडियामध्ये जास्त चर्चा होणार नाही. कारण कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे हे त्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेले असते. सामान्यांचे विषय मीडिया, राजकारणात चर्चिले जात नाहीत आणि त्या दिशेने कामही होताना दिसत नाही.
उच्चभ्रू समाजाला एक दिवस अंधारात ठेवले तर ते सर्व व्यवस्था डोक्यावर घेतात. आजचा आमचा दुसरा दिवस अंधारात आहे. पिढ्यान् पिढ्या विमुक्त व भटक्या जमाती पालावर अंधारात होत्या आणि सध्याही आहेत. परंतु जे समाज बांधव या परिस्थितीमधून परिवर्तन करून इच्छितात त्यांनाही अंधारात कुठंवर ठेवणार हा प्रश्न आहे. सध्या आम्हास मूलभूत सुविधा मिळणेही किती अवघड, आवाक्याबाहेरील होत चालल्या आहेत. दिवसेंदिवस सामान्य माणसाच्या माणूस म्हणून मिळणाऱ्या योजना अधिक दुरापास्त होत चालल्या आहेत याचे ज्वलंत वास्तववादी चित्रण मी आपल्यासमोर ठेवत आहे. सुजाण समाज बांधवांनो आता पुढील मार्ग आपल्या हाती आहेत. इथे हजारो, लाखोची वीज बिलं थकली आहेत. त्या वर्गाला सवलत मात्र भिक्षेक-यांना शिक्षा का? हा सवाल आता समाजव्यवस्थेला विचारावाच लागेल.
पाल निवासी
डॉ. कालिदास शिंदे
(मो. 9823985351)